ऑगस्ट २०२२

२०२२ साली अटलांटिक सिटी येथे भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विसाव्या अधिवेशनात सुषमा येरवडेकर यांनी ‘शब्दयोग’ हा एक अत्यंत प्रभावी आणि अगदी वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम सादर केला.

अधिवेशनासाठी मी व माझी पत्नी उपस्थित होतो, पण एकता प्रतिष्ठानाने प्रसिद्ध केलेल्या ‘विलासिनी’ व ‘संजीवनी’ ह्या दोन कथासंग्रहांचे वितरण आणि विक्रय यांमध्ये गुंतल्यामुळे आम्हाला ‘शब्दयोग’च्या कार्यक्रमास जाता आले नव्हते.   

एकता त्रैमासिकाचा मी वीस वर्षे संपादक होतो, तेव्हा सुषमा येरवडेकर सहसंपादिका होत्या, आणि नियमबद्ध १५ x १५ आकारांच्या शब्दकोड्यांच्या स्वरूपातील त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले होते; अनेक वाचकांना येरवडेकरांच्या शब्दकोड्यांचे व्यसनच लागले होते!  एकताचा अंक कधी हातात पडतोय, याची ते चातकाप्रमाणे वाट पाहात असत.

शब्दयोगसाठी वापरलेल्या शब्दकोड्याचे वैशिष्ट्य असे आहे, की फक्त कांही ठिकाणी ‘प’ हे अक्षर लिहिलेले आहे व बाकी सर्व जागा रिकाम्या सोडल्या आहेत. येरवडेकरांची शब्दकोडीं सोडवण्याचा मलाही नाद असल्यामुळे आता हे शब्दयोगचे      कोडे स्पर्धकांनी कसे सोडवले असेल हे कळेना.   https://www.aickum.org या संकेत-स्थलावर सदर कार्यक्रमाचे ध्वनि-चित्र-मुद्रण पहायला मिळाले, आणि असा कार्यक्रम सादर करण्याची कल्पना केवढी अचाट, केवढी भन्नाट होती, याची प्रचीति आली.  

प्रभाकर भोसले यांनी चितारलेले मुखपृष्ठ उठावदार, मनोवेधक व आकर्षक आहे. त्यातील स्त्रीच्या चित्रणाकडे पाहतां चित्रकारास ‘पिकासोचे अंशावतार’ म्हणण्याचा मोह आवरत नाही.

डॉ. प्रकाश लोथे यांचा पातंजल योगसूत्रांवरील १० पानी लेख वाचून समाधान झाल्यासारखे वाटले नाही. कारण हा विषय बराच गंभीर आणि नुसत्या वाचनाने समजण्याजोगा नाही. तसेच, लेखकाने कोणकोणत्या ग्रंथांचा अभ्यास करून हा लेख लिहिला आहे, हेही नमूद करायला हवे होते क्वांटम मेकॅनिक्सशी केलेली तुलना पटली नाही.

नितिन सुधाकर यांनी ‘थॉमस एडिसन सेंटर, न्यू जर्सी” हा लेख अधिक विस्तृत करायला हवा होता. त्या संग्रहालयात अशा आणखी कितीतरी गोष्टी असतील, की ज्या सर्वसामान्य अमेरिकनांनासुद्धा माहीत नाहीत.

डॉ. ललिता गंडभीर यांच्या ‘Tales Across Time’ या पुस्तकाचा परिचय करून देणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख कां केला नाही, हे समजले नाही.  

सुषमा येरवडेकरांनी हेमा शेंडे यांच्या ‘बागशाहीचा राजा जोसेफ बँक्स’ या लेखासाठी रंगीत छपाई करून घेतल्यामुळे लेख विशेष उठावदार झाला आहे.

प्रिया गोडबोले यांची ‘एक असावी’ ही कविता छान आहे. पण मुक्तछंदातील कविता एका लयीत म्हणतां आल्या तर अधिक सुबक होतात. सदर कवितेत ते काही ठिकाणी नीटपणे साधलेले नाही. त्या मानाने ‘हरळी’ ही आशयपूर्ण तर आहेच, पण शिवाय ती एका लयीत शेवटपर्यंत वाचतां व म्हणतां येते. लयभंग हा दोष विजया मराठे यांच्या ‘सृष्टी’ या अन्यथा सुंदर कवितेतही आढळतो. थोड्याशा फेरफरकांनी ही कविता अधिक सुबक होऊ शकते.

‘डॅनीचे श्वान कुटुंब’ ही कथा छान उतरली आहे. ‘कानगोष्ट’ ही कथा मोठी मजेदार आहे.

‘सांगायची गोष्ट’ हा वृत्तांत वाचल्यावर मनात आले, की प्रकाश येरवडेकर यांनी आर्किटेक्चरच्या क्षेत्रातील स्वतःचे अनुभव पुस्तक-रूपाने सविस्तर रीत्या प्रकाशित करावेत. या क्षेत्राबाबत मराठीत फार कमी लिखाण झाले आहे.

नाना दातारांचा ‘काव्य-शास्त्र-विनोदेन – लेखांक ५’ मी टंकित केला आहे. आता ते लवकरच ९१ वर्षांचे होतील. अजूनही त्यांचे लेखन-कार्य अविरत सुरु आहे. ‘काशावि’चे आजपर्यंत १२५ लेख तयार आहेत, असे ते मला परवा फोनवर म्हणाले. एकोपाच्या पुढील छापील अंकात त्यांचा ९९वा लेख प्रकाशित होईल. या लेखांचे कौतुक वाटणारी मंडळी कमी आहेत, पण त्यांना आस्था भरपूर आहे.

        -अरुण जतकर, मन्रोविल, पेन्सिल्वेनिया.