‘एकोपा’ आवाहन

 

‘एकोपा’साठी आपले अप्रकाशित मराठी साहित्य वा कलाकृती पाठवण्याचे आवाहन समस्त मराठी लेखक, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकार आणि छायाचित्रकार यांना करण्यात येत आहे. हे सेवाभावी प्रकाशन आहे म्हणून प्रसिध्द झालेल्या साहित्यासाठी आर्थिक मोबदल्याची अपेक्षा नसावी.

‘एकोपा’साठी अपेक्षित साहित्य:

कथा, माहितीपर लेख, विनोदी लेख, निबंध, आठवणी, नाट्यछटा

चुटके, स्फुटें, संकीर्ण उपयुक्त माहिती

कविता आणि

चित्रें, व्यंगचित्रें, छायाचित्रें.

कशासाठी? कोणासाठी?  विदेशी मराठी जनांचा शेजार राखणे हे ‘एकोपा’चे उद्दिष्ट आहे. म्हणजे आपल्याला मराठी कुटुंबांसाठी हे प्रकाशन करावयाचे आहे. त्यात पुढची पिढी आलीच.

विशेष सूचना: अवाच्या सवा लांबीमुळे न वाचले गेलेले लेखन निष्फळ ठरते. म्हणून पहिला मसुदा आपणच सफाईचा हात फिरवून आटोपशीर करावा हे उत्तम. आपला लेख वा कविता प्रकाशनास सिध्द करताना संपादकांच्या सूचनांप्रमाणे बदल करण्याची किंवा पुन्हा लिहिण्याची तयारी ठेवावी. आलेले साहित्य वाचनीय, रंजक आणि निर्दोष करण्याची जबाबदारी संपादकांवर असते त्यात आपण सहकार्य करावे ही अगत्याची विनंती.

काय लिहितां येईल? आपले विविध प्रकारचे अनुभव नोंदवल्यास ते ‘एकोपा’साठी विचारात घेतां येतील. कित्येक मंडळींना व्यवसायामुळे किंवा व्यासंगामुळे विशेष ज्ञान प्राप्त झाले आहे ते भावी पिढीसाठी नोंदवून ठेवणे महत्त्वाचे आहे. विशेषतः भारताच्या व आपल्या धर्माच्या इतिहासातल्या नक्की माहीत असलेल्या घटना, आज माहीत झालेल्या इतर पुराव्यांबरोबर पडताळून, पूर्वजभक्तीच्या आहारी न जातां, नोंदवणे आज आपल्या हातांत आहे. ते केल्याने आपल्या इतिहासाची खात्रीशीर माहिती मिळण्यासाठी पुढच्या पिढीला इतरांकडे पाहण्याची वेळ येणार नाही. आपले पिढीजात ज्ञान नोंदवणे आज आपल्या हातात असूनही केले नाही तर ती मोठीच घोडचूक होईल.

 

साहित्य पाठवण्याचे नियम: ‘एकोपा’साठी पाठवायचे साहित्य, स्वतःचे आणि पूर्वी कोठेही प्रसिद्ध न झालेले असावे. अर्थात ‘एकोपा’त प्रसिध्द झालेले आपले साहित्य आपण ‘एकोपाच्या सौजन्याने’ अशा उल्लेखासह इतरत्र अवश्य पाठवू शकतां.

आधारित, रूपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळ लेखकाच्या नांवासह तसा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे.

साहित्याच्या निवडीत संपादकांचा निर्णय अंतिम राहील. निवडलेल्या साहित्यात मोजकेपणा, नेमकेपणा, पडताळा (fact check) आणि शुध्दलेखन यांसाठी आवश्यक ते बदल सुचवण्याचा हक्क संपादकांना आहे.

टंकलिखित साहित्यः जर आपण गूगल् युनिकोड् फॉण्ट् वापरूनच मराठीमध्ये टाईप करत असाल तर आपले साहित्य तशा प्रकारे टाईप करून, वर्ड फाईल म्हणून ईपत्राला जोडून ‘एकोपा‘ला पाठवावे. (पीडीएफ नको.)

हस्तलिखित साहित्य: जर आपण हस्तलिखित साहित्यच पाठवू शकत असाल तर ते ८ १/२” गुणिले ११” आकाराच्या पांढऱ्या कागदावर, चारी बाजूंस १”चा समास सोडून, ठळक काळ्या शाईने, सुवाच्य अक्षरात, खाडाखोड न करतां, लिहिलेले असावे. ते प्रतदर्शित (scan)करून ईपत्रास पुरवणी म्हणून खालील ईपत्त्यावर पाठवावे म्हणजे आपली मूळ प्रत आपल्याकडेच राहील.

कथनः ऐकलेले मराठी समजते पण लिपीचा सराव नसल्यामुळे वाचन अवघड वाटते अशांसाठी आणि छपाईचा व्याप कमी करण्यासाठी श्रवणांक काढले जातील. श्रवणांकासाठी लेखकांनी आपले साहित्य स्वतः वाचून ध्वनिमुद्रित करावे किंवा दुसऱ्या योग्य व्यक्तीकडून तसे करून घ्यावे व ‘एकोपा’ ला पाठवावे. वर्गणीदारांसाठी पीडीएफ काढून घेण्याची सोयही केली जाईल.

आपला लेखी मजकूर ध्वनिमुद्रित मजकुराशी तंतोतंत जुळणारा असणे आवश्यक आहे याची दखल घ्यावी.

साहित्य पाठवायचा ईपत्ता <sushamayera@yahoo.com>

मनःपूर्वक धन्यवाद!