पहिल्या छापील अंकावरील प्रतिक्रिया

बऱ्याच वाचकांनी ईपत्राने ‘एकता’ची उणीव भरून काढण्याच्या ‘एकोपा’च्या प्रयत्नाला दाद, शाबासकी तसेच प्रोत्साहन दिले. काहींनी फोनवरून सविस्तर तोंडी अभिप्राय   दिला. पुढील लेखी अभिप्रायातला एक सविस्तर, एक उत्स्फूर्त आणि मनमोकळा, एक कवितेतून एकता ते एकोपा या सांधेबदलाची दखल घेणारा तर एक साकल्याने लिहिलेला आहे म्हणून ते येथे दिले आहेत. -सं.


‘मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक वाटते. वाचणाऱ्याची उत्सुकता वाढते. लोकेच्छेचा दिवा तेवतो आहे हे पाहतांक्षणीच पटते. मलपृष्ठही तितकेच उत्तम असून चित्रकाराचे कसब जाणवते. ‘अजुनि खुळा हा नाद’ व ‘बावीस वर्षांची साथ’ हे दोन्ही लेख येथील वाचकांना भलतेच पसंत पडले. कारण मराठी  माणसाचे नाट्यवेड व मोटारीची हौस. बहुतेकांना आपल्या मोटारीची आठवण झाली. कोल्हटकर कुटुंबियांची माहिती विशेष उल्लेखनीय वाटली. कवितांपैकी ‘देवाशी संवाद’ व ‘प्रिय अनुराधा’ ह्या विशेष वाटल्या.काही नव्या कल्पना मांडल्या आहेत त्या चांगल्या वाटल्या. ‘अवघे पाऊणशे वयोमान’ व ‘ चांदण्याचे वाण’ ह्या ठीक आहेत.

‘आपण काय शिकलो?’ ‘काय म्हणालात?’ व ‘सांगायची गोष्ट,’ वैयक्तिक अनुभव कथन करणारे आहेत तरी पण वाचनीय वाटतात. ‘रक्तग्रथन’, ‘सीता-त्याग’ आणि स्त्रीपंचक हे तिन्ही माहितीपूर्ण वाटले. पूर्णपणे शास्त्रीय, सीता-त्याग हा संस्कृतप्रचुर व स्त्रीपंचक हा स्त्रीची महत्ता दर्शवणारा असाधारण लेख आहे असे मत पडले.

‘खिरापत’ ‘चपखल’ आणि ‘पहिला डाव’ ही सदरे डोक्याला चांगला व्यायाम देणारीं आहेत. वरकरणी सोपीं पण प्रत्यक्षात बिकट अशीं आहेत. कथांपैकी ‘क्रमांक तीन,’ ‘एकी,’ ‘मोरपिशी,’ ‘पालवी’ ह्या हलक्या व मनोरंजक वाटल्या. इतर कथा ‘आणि तू हरवलीस,’ ‘व्याकुळ कातरवेळा,’ ‘देवघर’ यांचे मूल्यमापन प्रत्येकाने आपल्या मताप्रमाणे करावे. ‘चित्रवेध’ द्वारे नवा उपक्रम सुरु केला आहे तो स्वागतार्ह वाटला.  एकंदरीत पाहतां ‘एकोपा’चा पहिला अंक दुसऱ्या अंकाबद्दल उत्कंठा वाटावी इतपत सरस वठला आहे.’ -प्रांजळ पंचकडी, पुणे

‘एकोपा’ मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचला. उत्कृष्टशिवाय वर्णनाला शब्द नाहीत. लेख, चित्रे उत्तम. कोडीं मात्र कठीण. क… मा …ल…!                 

  –  शोभा भेण्डे, मुंबई


एकताचे नवे रूप – एकोपा

देश आपुला आणि प्रियजन सोडून आलों दूर

आशा प्रगतीची उरी, तरी वाटे मनी हुरहूर

वाटे कुणी पुसावे, दाटले मनी खूप, ते सांगावे

समजून घेऊन कुणीतरी,  मनोमनी ऐकावे

नवा देश नवे बंध,  होतो शोधत आम्ही सुख

जाहली त्याच वेळी आमची एकताशी ओळख

बोलू लागलो एकतामुळे, आमच्या मनीची व्यथा

गुंफू लागलो आम्ही शब्द अन् अनुभवांच्या कथा

आखीव रेखीव कसे लिहावे झाली आम्हा जाण

यमक, अनुप्रास, वृत्त गणांनी जाहलो सुजाण

होती एकतात बुद्धी, विचार,भावनांना प्रेरणा

शब्दकोडे, खिरापत, चपखल मेंदूला चालना

अखंड करून सेवा, एकताने घेतली निवृत्ती

ठेवण्या परंपरा चालू, एकोपाने शोधली युक्ती

घेतला एकोपाने वेष हो, सुंदर सुटसुटीत

साजेसा अमेरिकन जीवना, झाला चटपटीत

नवरूपात झळकेल तो, लेऊन संगणक शास्त्र

यशस्वी होईल एकोपा निश्चित, हा आमुचा मंत्र

                                      – विजया मराठे, कॅलिफोर्निया.


०सौ. सुषमा येरवडेकर,

सपादक, ‘एकोपा,’ ह्यांना सप्रेम नमस्कार,

      गेल्या आठवड्यात “एकोपा”चा अंक तसेच, ‘एकता’चे मागील वर्षाचे २ अंक वाचायची मला संधी मिळाली. सध्या महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात देखील सर्रास इंग्रजी शब्दांचा ‘वावर’ आढळून येतो आणि मराठी व्याकरणाच्या चुकादेखील भरपूर आढळून येतात. ह्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील मराठी व्यक्तींनी प्रकाशित केलेले मासिक कसे असेल ह्याबद्दल औत्सुक्य होते. पण हे अंक वाचल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ‘एकोपा’ची रूपरेषा बघितल्यावर, त्याचे प्रयोजन केवळ मराठी भाषेचेच नव्हे तर, आपल्या मराठी / भारतीय संस्कृतीचेदेखील जाणीवपूर्वक संवर्धन करणे आहे हे प्रकर्षाने लक्षात आले. त्यातील लेख, वेगवेगळीं सदरे, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्याचा प्रयास ह्यातील ‘विचक्षणपणा’ पदोपदी जाणवला. आणि हे सर्व करताना भाषेची अचूकता आणि एकूणच मासिकाची आशयसंपन्नता ह्याबद्दल विशेष जागरूकता जाणवली.

     तुमचे लेख वाचून विशेष आनंद झाला. वर लिहिल्याप्रमाणे, सद्यस्थितीत ‘इये महाराष्ट्रदेशी’ देखील इतके वातावरण बदलले आहे की, इंग्रजी शब्द न वापरतां चारसहा सलग वाक्ये बोलतां – लिहितां येणे दुर्मिळ झाले आहे. तुमच्या लेखातील मराठीसारखे प्रवाही, प्रासादिक आणि रंजक लिहिणे हे फार अवघड आहे. मग तो तुमच्या मैत्रिणीवरचा लेख असो किंवा वडिलांविषयीचा असो. किंवा अन्य कोडी, सदरे असोत. मासिकाचे सर्वांगीण स्वरूप बघतां – ते जाणकार मराठी रसिकांना अति बाळबोध वाटणार नाही, तसेच नवोदित वाचकांना अति क्लिष्ट वाटणार नाही हा समतोल कटाक्षाने ठेवल्याचे लक्षात आले.

     अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या ह्या माय-मराठीचा झेंडा अमेरिकाक्षेत्री फडकावत ठेवण्याचे महान कार्य ‘एकोपा’ नक्कीच करेल ह्यात काहीच शंका नाही. तुमच्या ह्या सर्व कार्याला मनोमन वंदन आणि आगामी कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. ह्या कार्याबद्दल मी माझ्या येथील मित्रमंडळींनादेखील आवर्जून कळवले आहे. आपले हे सर्व कार्य बघून आवर्जून दाद द्यावी असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.                       

                                          – नितीन सुधाकर, पुणे.