फेब्रुवारी २०२२

एकोपाचा ह्या वर्षीचा पहिला अंक वाचला.

मुखपृष्ठ फारच सुंदर! श्री अरविंद नारळे नेहमीच चांगली चित्रे काढतात. ह्या वेळेस लतादीदींच्या चित्राचे औचित्य व रेखाचित्र काढण्यामागील त्यांचे विचार, ह्याचीही दखल घ्यावीशी वाटते. मलपृष्ठावरील  फोटोही छानच आहे. एकाच पारिजातकाच्या फुलाचे काहीतरी वेगळेपण जाणवते. 

श्री दातार यांचे “काव्यशास्त्रविनोदेन”, लोथे यांचा “पतंजलीची योगसूत्रे” हे लेख अंकाची योग्यता बरीच वर नेतात. 

संपादिकेच्या कोड्यांबद्दल तर विचारायलाच नको. एकताच्या काळापासून ती वाचकांच्या आवडीची आहेत. मला कोडी सोडवण्याची आवड नाही तरीही हीं कोडी पाहून सोडवायचा प्रयत्न करावा असे मला खरोखरच वाटते. कथांचा दर्जा मात्र सुधारणे आवश्यक आहे. 

‘एकोपा’ सुरु केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! हे काम नक्कीच सोपे नाही. ह्या कामाकरिता आपणास नेहमीच सर्वांचे सहकार्य मिळत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

— अनुराधा कुलकर्णी, ब्लू ॲश, ओहायो


नमस्कार, सुषमाताई,

एकोपाचा फेब्रुवारी अंक फारच छान आहे. तुमचे या ‘कलाकृती’मागील कष्ट, बुध्दीमत्ता, खोलवर असलेली साहित्यिक जाण हे सगळे जाणवते. त्याशिवाय हा अंक एवढा संपन्न व साजरा झाला नसतां. अभिनंदन !

पुढच्या एकोपाची उत्सुकतेनं वाट पाहातेय.

सस्नेह,

— भाग्यश्री बारलिंगे, मेसा, ॲरिझोना


संपादक, ‘एकोपा’

फेब्रुअरी २०२२ च्या अंकावर ही माझी प्रतिक्रिया.

लता मंगेशकरांचे रेखाचित्र अतिशय उत्तम. शेडिंग न करतां केवळ रेघांनी काढलेले चित्र व त्याचे चेहऱ्याशी साम्य छान उतरले आहे. अरविंद नारळे अत्यंत गुणी कलाकार आहेत. त्यांच्या कलाकृती ‘एकता’तून मी वर्षानुवर्षे पाहत आलो आहे. त्यांच्या कल्पकतेची कमाल आहे. ‘ती जातां’ हा एखाद्या वृत्तपत्रात यावा असा लेख आहे.’जगावेगळा माणूस’ हा लष्करी खात्यातील पण अत्यंत वेगळ्या, हरहुन्नरी व्यक्तीचा सुरेख शब्दांत दिलेला परिचय खूप आवडला. ‘चित्रवेध’ नेहमीसारखे छान!

‘डोळे सांगत राहिले’ हा वेगळ्या धर्तीचा, माहितीपूर्ण स्वानुभव छान लिहिला आहे, आवडला.

 ‘अघटित पोचवणी’ मध्ये कल्पनाविलास जमला आहे, आवडला. ‘जे वेड मजला लागले’ हा हलकाफुलका लेख ठीक आहे. ‘पक्ष्यांसाठी खानावळ’ मधला वेगळा अनुभव आवडला. ‘गीत महाभारत’ या अत्यंत वेगळ्या उपक्रमाची छान माहिती दिली आहे. ‘सांगायची गोष्ट’ मध्ये एक वेगळा अनुभव आहे.

 ‘भिंतीवरली गोष्ट’ मध्ये वेगळ्या अनुभवाचे व व्यक्तींचे सुरेख चित्रण आहे, चित्रही छान आहे. ‘काय देखे कवि’ वरील चारोळीचे मर्म नारळे यांच्यापेक्षा जतकरांनी चपखल शब्दांत पकडले आहे, दोन्ही छान!

 ना. भा. दातार यांचे संस्कृतवरील प्रभुत्व, तसेच बरींच वर्षे ‘एकता’त आणि आता ‘एकोपा’त सतत, चिकाटीने ‘काव्यशास्त्रविनोदेन’ ही लेखमाला सादर करीत आहेत, याबद्दल मला आदर आहेच पण हा माझा प्रांत नाही. तसेच योग व अध्यात्म यांची मला आवड नाही आणि त्यातले काही कळतही नाही. 

अरविंद गोरे, पटोमॅक, मेरीलंड