ऑगस्ट २०२१

॥ ॐ ॥

सन्माननीय संपादक, ‘एकोपा’ यांस. स. न.

‘एकोपा’चा दुसरा अंकही खूप आवडला. त्यामध्ये ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही अंगांनी युक्त असे उत्तम लेख आहेत!

आपण इथे अमेरिकेत स्थायिक झालों आहोत, तेव्हा इथली स्थानिक इंग्रजी भाषा आपण व्यवहारात नित्य वापरतोंच परंतु आपल्या अंतर्मनात आपल्या मातृभाषेनं ठाण मांडलेलं आहे; कारण ती आपल्याला इतकी प्रिय आहे की ती एक प्रकारे आपला ‘बहिश्चर प्राण’च आहे, नाही का? त्यामुळेच ‘एकता’ बंद पडल्याने खूप हळहळ वाटली हे साहजिकच होते! परंतु तुम्ही ‘एकोपा’ चालू केल्याने मनःपूर्वक आनंद वाटतो!!

सुषमाताई, तुमची अंगहुशारी, मराठीचे सखोल ज्ञान व प्रेम, लेखनातले बारकावे न्याहाळणे इत्यादी अनेक गुणांमुळे तुम्ही उत्तम रीतीने संपादनकार्य करू शकतां व ‘एकोपा’चे खूप वाचनीय अंक काढू शकतां ही गोष्ट आम्हाला फार समाधानाची वाटते. ‘एकोपा’ चिरायु होवो!!

श्री. विजय ढवळे यांचा लेख अत्यंत उत्तम आहे. त्यांच्या पत्नीच्या अंगातील विविध सद्गुणांचे वर्णन वाचून आणि त्यांचे लेखनकौशल्य जाणवून मन थक्क झाले. अशा लेखांनी अंकाचा भारदस्तपणा वाढतो.

सुषमाताई, मराठी साहित्याचा अमृतप्रवाह तुम्ही असाच वाहता ठेवावा! त्यासाठी परमेश्वर सदैव उत्तम यश देवो ही प्रार्थना!

आपली नम्र,

शालिनी सराफ, न्यू जर्सी.